Tuesday, October 4, 2016

महाराष्ट्र धर्म- एक चळवळ

महाराष्ट्र धर्म- एक चळवळ
भाग 1

    महाराष्ट्र धर्म हे शब्द संत रामदासांनी हिरीरिने, आग्रहाने 350 वर्षांपूर्वी परत मांडले. समर्थांपूर्वी महाराष्ट्र धर्म संकल्पना एकनाथांच्या समकालीन असलेल्या सरस्वती गंगाधरांनी श्रीगुरुचरित्रात व पंधराव्या शतकातील (इ.स. 1480) महिकावतीच्या बखरीत उच्चारली आहे. महिकावती बखरीत लिहिले आहे - ‘या उपर देशांमध्ये बहुत यवन झाले. राज्य अभिमान सोडला, शस्त्रे सोडली. कृषी धरिली, आचारहीन जाले, जाणोन देवीने धर्मराष्ट्र, माराष्ट्र रक्षायाकरणे राजश्री नायकोरायास स्वप्न दिले. जर जातीमेळावा करावा. श्रीदेवी आदिशक्ति, जगदंबिका, महाराष्ट्रधर्मरक्षिका तुम्हास प्रसन्न असो.’ ‘वेदशास्त्राचार आहे तो श्रेष्ठ व कुलाचार व देशाचार श्रेष्ठ तरी हा धर्म सर्वधर्मांचा जीव मूळ धर्म माराष्ट्र.’
    मुळात महाराष्ट्र धर्म संकल्पनेमागे अध्यात्म व राजकारण यांची हातमिळवणी करणे हे ध्येय होते. त्यातुन परकीय यवनांपासुन सनातन हिंदु धर्म रक्षण व त्या अंतर्गत महाराष्ट्रात संत परंपरेने रुजवलेल्या भागवत पंथाच्या चळवळीचे रक्षण हे ध्येय स्पष्ट होते.
    ही चळवळ समजुन घेण्यापूर्वी धर्म ही संकल्पना समजुन घेऊ- आपल्या पूर्वजांनी धर्माची व्याख्या करताना- यतो अभ्युदय नि:श्रेयस सिद्धी: स धर्म: । असं म्हटलं आहे. म्हणजे धर्म या संकल्पनेमध्ये अभ्युदय म्हणजे सांसारीक यश व निश्रेयस म्हणजे पारमार्थिक यश या दोन्ही गोष्टींना समान महत्त्व दिलं आहे. दोन्ही पातळीवर व्यक्तिला सर्वोच्च समाधानाची स्थिती गाठण्यासाठी मार्ग दाखवणे हे धर्माचे कार्य होय.
    संस्कृतीची परंपरा अशी तयार होते- अशा धर्माचा व्यक्तिला बोध होताना वा झाल्यानंतर तो प्रतिकांच्या वा शब्दांच्या माध्यमातुन इतरांना समजावताना व इतरांनी त्यांच्या त्यांच्या समजेनुसार त्या उपदेशाचे अर्थ लावताना व लावलेले अर्थ पुढच्या पुढीला सोपवत असताना, त्या त्या पिढीत तो बोध संकेत समजुन घेण्याच्या प्रक्रियेत तो व्यक्ति राहत असलेल्या भौगोलिक प्रदेशाच्या प्रभावाने तिच्याशी जुळवुन घेताना व्यक्तिगत वा सामुहिक अशी विशिष्ट अभिव्यक्ति तयार होते व तिलाच आपण त्या धर्माची परंपरा, संस्कृति, प्रथा म्हणतो.
    महाराष्ट्र धर्म चळवळ सुरु का झाली- उपरोक्त वर्णित धर्माचे सर्वोच्च समाधान मिळवण्यासाठी सर्व स्तरांतील सामान्य जनांना अनेक बाबींबरोबर न्याययुक्त सामाजिक स्थितीचीही गरज लागते की जी समाजाने तयार केलेल्या उदार नियमांच्या चौकटीत राहुन व्यक्ति मुक्त स्वातंत्र्याने एका आयुष्यात प्रपंच व पारमार्थिक ही दोन्ही सुखे सहज मिळवु शकेल व आपलं आयुष्य साजरं करु शकेल.
    परकियांच्या आक्रमणामुळे न्याययुक्त स्थिती संपून गेली. धर्म म्लान झाला होता व लोकचेतना बदलासाठी, नवक्रांतीसाठी आसुसलेली होती. परभूमीवरुन आपली विशिष्ट राजकीय अभिलाषा व त्याबरोबर पंथीय अभिनिवेश घेऊन आलेले क्रुर सत्ताधीश बुभुक्षित नजरेने हिंदुस्थान या सुवर्णभूमीकडे आकृष्ट झालेले होते व त्यांनी स्थानिक राज्यकर्त्यांना मांडलिक करुन वा संपवुन त्यांची जुलमी राजकीय सत्ता व संस्कृति एतद्देशियांवर लादण्याचा प्रयत्न चालवला होता. हे आक्रमण केवळ भूमीवर नव्हते तर हजारो वर्षांपूर्वीपासुन भारतीय म्हणून वेगळेपण जपलेल्या धार्मिक, सांस्कृतिक, आध्यात्मिक जीवन शैलीवरही होतेच. जिच्याशी अगदी मिळतीजुळती अशी परकीय धार्मिक विचारधारा, प्रथा-परंपरा नव्हती.
    जातीपातीला कंटाळून म्हणा, परकियांना घाबरुन वा शक्ति प्रदर्शनाने प्रभावीत होऊन म्हणा, पर्याय मिळाला म्हणून म्हणा पण अनेक लोकांनी परकियांची सत्ता, पंथ वा जीवनशैली स्वीकारली. आधीच भारतीयांत जातीपातीचे व विविध पंथांत सैद्धांतिक वाद होतेच त्यात परदेशी पंथ स्वीकारल्याने वादात भर पडली. परकीय सत्ताधीशांची सत्ता उलटवण्यासाठी जसे राजकीय प्रयत्न चालु होते तसे धर्म क्षेत्रातही आखाड्यांमधुन नागा साधुंनी एल्गार पुकारला होता. समाजात राहणार्‍या संतांनीही साहित्यातुन वा लोकांत जाऊन विचार मांडायला, काम करायला सुरुवात केली होती.
    हिंदुस्थानच्या भाग्याने विविध काळात, त्या त्या काळातील समस्यांचे व संघर्षाचे अवलोकन करुन, त्या त्या काळाच्या लोकभाषेत त्या समस्यांवरील उतारा सांगणारे राजकीय, सामाजिक व धार्मिक क्षेत्रात महापुरुष जन्माला आले. ज्यांनी केवळ समस्यांवर उत्तरं दिली नाहीत तर प्रत्यक्षात लोकांत मिसळुन जमिनीवर काम केले व न्याययुक्त, स्वातंत्र्यपूर्ण स्थिती कायम ठेवण्यासाठी कष्ट घेतले.
    350 वर्षांपूर्वी संत रामदासस्वामी, जगद्गुरु संत तुकोबारायांसारख्या अनेक संतांनी असे कार्य केले व राजकीय कार्य प्रसंगी आपल्या प्राणांचा व धनाचा व्यय करुन शिवरायांच्या मार्गदर्शनाखाली मराठ्यांनी केले.
    समर्थ म्हणाले- मराठा तितुका मेळवावा । महाराष्ट्र धर्म वाढवावा । ये विषई न करता तकवा । पूर्वज हासति ॥ - हा म्लान झालेला धर्म परत स्थिरस्थावर केला नाही तर पूर्वज हासतील असे मार्मिक भान ते देतात. कारण धर्म व राष्ट्र यांचा निकटचा संबंध आहे. महाराष्ट्र हा शब्द वापरताना त्यामागे जराही मर्यादित प्रांतिक अभिनिवेश नाही तर व्यापक हिंदुस्थानी भान आहे.
    महाराष्ट्र ही कर्मभुमी निवडल्यामुळे पराक्रमाचे विचार इथल्या हृदयात रुजवताना शौर्याचे स्फुल्लींग इथल्या मातीत पेटले तर त्याचा वणवा हिंदुस्थानभर पसरेल असे स्वप्न त्यामागे होते. मराठा शब्द वापरतानाही महाराष्ट्रात जन्मलेला व पूर्वजांचा परंपरेने आलेला सर्वसमावेशक, स्वातंत्र्यभोक्ता, उदात्त धर्म धारण केलेला व त्याचा रक्षणकर्ता असा प्रत्येकजण असा व्यापक भाव आहे. त्याच्यामागे राष्ट्रधर्माचा भाव सहजच प्रगट होतो.   
    महाराष्ट्रात जातीपातीची, पंथीय वादाची तसेच परकीय सत्तेची सर्व पातळीवरील गुलामगिरी झुगारुन तळागाळातील कष्टकर्‍यांचे, व्यापारातुन धन निर्माण करणार्‍यांचे, आत्मगौरवासाठी वेळप्रसंगी नांगर सोडुन तलवार हातात घेणार्‍या शौर्याचे तर सत्यान्वेषी तपास्व्यांचे स्वातंत्र्य त्यांना परत भोगता यावे, ज्याचे त्याचे कर्म-धर्म त्यांना परत न घाबरता करता यावे अशी शाश्‍वती शिवरायांच्या नेतृत्वाखाली मिळाली. ज्याला संत महापुरुषांनी अभंगातून वैचारिक खाद्य पुरवले. न्याययुक्त हिंदवी स्वराज्य व स्वधर्मस्थापना ही उद्दीष्टे महाराष्ट्र धर्म चळवळ संस्थापने मागची होती हे स्पष्ट होते.
    शिवरायांच्या पुरुषार्थाला यश मिळताना समर्थ रामदासस्वामी पाहत होते, म्हणुनच- या भूमंडळाचे ठायी । धर्म रक्षी ऐसा नाही । महाराष्ट्र धर्म राहिला काही । तुम्हा करिता ॥ असे श्रेय त्यांनी शिवरायांना दिले. तसेच- आहे तितुके जतन करावे । पुढे आणिक मेळवावे । महाराष्ट्र राज्य करावे । जिकडे तिकडे ॥ ही अपेक्षाही नेतृत्व व कार्यकर्त्यांकडे व्यक्त केली. या चळवळीच्या यशासाठी ज्याने त्याने आपापल्या कार्यक्षेत्राशी प्रामाणिक राहुन पराक्रमाची शर्थ करावी असेही समर्थ सांगतात- रायांनी करावे राजधर्म । क्षत्री करावे क्षात्रधर्म । ब्राह्मणी करावे स्वधर्म । नाना प्रकारे ॥ शिवाय या कार्यात शिवरायांना यश मिळावे म्हणून पारघाटाच्या प्रतापभवानीला ‘तुझा तु वाढवी राजा । शिघ्र आम्हासी देखता ॥’ अशी प्रार्थनाही करतात.
    मित्रांनो ! या छोट्या लेखातून महाराष्ट्रधर्म या व्यापक विषयात हात घालण्यापूर्वीची वैचारिक पार्श्‍वभुमी तयार करण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. या विषयाला अनेक व्यापक कंगोरे आहेत. महाराष्ट्र धर्माच्या संदर्भात विविध मराठी व हिंदी भाषेतील यापुढील लेख वाचताना याचा खचितच उपयोग होईल. देशपातळीवर हा क्रांतीकारी विचार पोहोचावा व त्यातुन स्वदेश व स्वधर्म स्वाभिमानी तुतारीच्या रणभेदी आवाजाने दशदिशा व्यापाव्यात हीच प्रामाणिक इच्छा आहे.
लेखक, कलाकार व व्याख्याते- दामोदर प्र. रामदासी, पुणे. 9850119474